मानसशास्त्र हे एक शास्त्र आहे . प्रत्येक शास्त्रात विशिष्ट विषयाचा पद्धतशीर अभ्यास केला जातो . कोणत्याही विषयाची सुव्यवस्थित ज्ञानरचना म्हणजे शास्त्र होय . प्रत्येक शास्त्राची काही उद्दिष्टे असतात . ज्याप्रमाणे Physics या शास्त्राचे प्रमुख उद्दिष्टे म्हणजे आपल्या भोवतालची सृष्टि , भौतिक जग यातील घटना -घडामोडी कशा घडून येतात यांचे आकलन करणे होय , तसेच खगोलशास्त्रीय (Astronomy ) या शास्त्राचे प्रमुख उद्दिष्टे म्हणजे विश्वाचे स्वरूप आणि विश्वाची रचना समजावून घेणे , तसेच हे विश्व कसे अस्तित्वात आले आणि विश्वात काय घडामोडी घडतात याचे आकलन करणे होय .
त्याचप्रमाणे मानवी आणि इतर प्राण्यांच्या वर्तनाचे गूढ उलगडण्यासंबंधीची अशी मानसशास्त्राची चार प्रमुख उद्दिष्टे आहेत .वर्तनाचे वर्णन : काय घडत आहे याचे निरीक्षण किंवा आकलन करणे हे मानसशास्त्राचे प्रथम उद्दिष्ट होय . कोणतीही गोष्ट समजून घेण्यासाठी व तिचे आकलन होण्यासाठीची पहिली पायरी म्हणजे त्या गोष्टीस नाव देणे किंवा काय घडते ते अभ्यासणे होय . वर्तनाचे निरीक्षण करणे आणि त्यासंबंधीच्या सर्व गोष्टींची नोंद घेणे म्हणजे वर्णन होय .
म्हणजेच काय घडत आहे , ते कोठे घडत आहे , कोणासंबंधी घडत आहे आणि कोणत्या परिस्थितीत ते घडत आहे यासंबंधीचे वर्णन किंवा आकलन करणे हे मानसशास्त्राचे पहिले उद्दिष्ट आहे.उदारणार्थ , एखाद्या शाळेतील मुलगा वेगळा वागत आहे हे शिक्षकाच्या लक्षात येते . त्याचे अध्ययनाकडे लक्ष नाही , गृहपाठ वेळेवर करत नाही , शाळेत त्याची गुणवत्ता घसरत आहे . त्याच्या बाबतीत हे जे घडत आहे किंवा तो जे काय करत आहे त्याचे वर्णन करणे म्हणजेच दुसऱ्या उद्दिष्टाची सुरुवात म्हटली पाहिजे . तो असा का वागतो याचा उलगडा करणे म्हणजे दुसरे उद्दीष्ट होय .
वर्तनाचे स्पष्टीकरण : लोक असे का वागतात याचे स्पष्टीकरण मानसशास्त्रात केले जाते . उदाहरणातील मुलगा अशा प्रकारच्या गोष्टी का करतो , हे जाणून घेण्यासाठी शालेय समुपदेशकामार्फत त्याला काही चाचण्या देऊन शिक्षक त्याच्या वर्तनासंबंधीच्या कारणांचा शोध घेऊ शकतात . त्याला काही शारीरिक आजार आहे काय याबाबत त्याचे पालक डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात . वर्तनासंबंधीच्या स्पष्टीकरणाच्या आधारे वर्तनासंबंधीच्या उपपत्ती मांडणे शक्य होते . अशा रीतीने सर्व प्रकारच्या वर्तनाचे स्पष्टीकरण व कारणमीमांसा करणे हे मानसशास्त्राचे प्रमुख उद्दिष्ट आहे .
वर्तनाचे पूर्वकथन : एकदा वर्तनासंबंधीची कारणे समजली , कारण -कार्यसंबंध प्रस्थापित झाला की , वर्तनासंबंधी पूर्वकथन करणे सोपे जाते . एखाद्या व्यक्तीचे कोणत्या वेळी , कोणत्या परिस्थितीत कशा प्रकारचे वर्तन होईल याबाबत बऱ्याच अंशी निश्चित स्वरूपात पूर्वकथन करणे शक्य होते . अर्थात पुढच्या क्षणाला किंवा भविष्यात व्यक्तीचे वर्तन कसे असेल याविषयीच्या पूर्वकथनास काही बाबतीत मर्यादा पडतात .वर्तनाचे नियंत्रण : वर्तनाची कारणे समजून त्यासंबंधी पूर्वकथन करता आल्यामुळे इतर व्यक्तींच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणे शक्य होते . म्हणूनच वर्तनाचे नियंत्रण करणे हे एक मानसशास्त्राचे महत्वाचे उद्दिष्ट होय . व्यक्तीच्या वर्तनात अपेक्षित बदल घडवून आणून तिच्या वाईट सवयी व वर्तनावर नियंत्रण आणणे हे मानसशास्त्राचे उद्दिष्ट होय .मानसशास्त्रीय अभ्यासाची ही चार प्रमुख उद्दिष्टे होत . मानसशास्त्राच्या अभ्यासाने हे शक्य आहे असा मानसशास्त्रज्ञांचा दावा आहेशेवटी मानसशास्त्र म्हणजे मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक होय . म्हणूनच मानवी जीवनातील विविध समस्या सोडवण्यासाठी मानसशास्त्रातील मूलभूत तत्वांचे उपयोजन करणे हे मानसशास्त्राचे महत्वाचे उदिष्टय होय .