mahashivratriमहाशिवरात्रीला शंकराची पूजा करुन रुद्राभिषेक व उपवास करतात. या दिवशी बेलाच्या पानाला विशेष महत्त्व असते. अनेक ठिकाणी महाशिवरात्रीची जत्राही भरते. एकेका हिंदू देवतांची स्वत:च्या आवडीची फळे-फुले कोणती ते ठरलेले आहे. शंकराला बेलाचे त्रिदल आणि धोत्र्याचे फूल प्रिय आहे.
महाशिवरात्रीविषयी एक कहाणी प्रसिध्द आहे. फार पूर्वी एक शिकारी शिकार करण्याकरितां अरण्यात गेला होता. तो झाडावर दबा धरुन बसला. ते झाड बेलाचे होते. परंतु शिकार करण्याच्या दृष्टीने झाडाच्या फांद्या आड येऊ लागल्या. म्हणून त्याने बेलाची पाने तोडण्यास सुरवात केली. त्या झाडाखाली शंकराची एक पिंड होती. त्या पिंडीवर आपोआप बेल पडू लागला. इतक्या अवधीत पाणी पिण्यासाठी एक हरिणी आली. त्या शिका-याने तिच्यावर नेम धरला. याची हरिणीला चाहूल लागली. तेव्हा तिने शिका-याला सांगितले की माझी लहान बाळे घरी आहेत. त्यांना मी भेटून सूर्योदयापूर्वी पुन्हा इकडे येते. मग माझी शिकार कर. शिका-याने तिचे म्हणणे कबूल केले. हरिणी परत येण्याची तो वाट पाहू लागला. रात्रभर झाडावर राहिल्याने त्याला आपोआपच उपवास घडला. शिका-याला सांगितल्याप्रमाणे हरिणी तेथे हजर झाली.
तिचा प्रामाणिकपणा पाहून शिका-याचे अंतःकरण द्रवले. त्याला तिची दया आली व तिला मारायचे नाही असे त्याने ठरवले. या सर्व गोष्टीमुळे शंकर शिका-यावर प्रसन्न झाले. आणि त्यांनी शिका-याला व हरिणीला विमानांत बसवून उध्दरून नेले. म्हणून जे लोक महाशिवरात्रीचे व्रत करतील ते सदैव सुखी रहातील असे म्हंटले जाते.
या दिवशी सर्वांनी उपवास करण्याची पध्दत आहे. सकाळी स्नान वगैरे करून शंकराला जाऊन बेलाची पाने व कवठ हे फळ शंकराला वाहिले जाते. आंब्याला या सुमारास मोहोर येतो. महाशिवरात्रीला शंकराला आंब्याचा मोहोर वाहण्याचीही प्रथा आहे. हाताने तयार केलेल्या कापसाच्या दो-याच्या ७५० वाती करून शंकराच्या देवळात किंवा घरातील देवापुढे या वाती तुपांत भिजवून लावल्या जातात. उत्तर भारतात या दिवशी खसखस व थंडाई घालून भांग पिण्याची पध्दत आहे. घरोघरी साबुदाणा खिचडी, रताळी, बटाटे यांपासून केलेले जिन्नस वगैरे खाण्याची प्रथा आहे.