Translate to
एका किराणामालाच्या दुकानात खूप उंदीर राहत होते. किराणा मालाचे दुकान असल्यामुळे त्यांना तिथे भरपूर खायला मिळायचे. धान्य, सुका मेवा, बिस्किटे आदी वस्तूंवर ते ताव मारायचे. अशा खादाड उंदारांमुळे दुकानदाराचे खूप नुकसान होत असे. दुकानदारांने विचार केला की या उंदारांचे काहीतरी करायलाच हवे. नाहीतर एक दिवस मला कंगाल होण्याची पाळी येईल.
हा विचार करत दुकानदाराने एक दिवशी एक मांजर दुकानात आणली. ती आल्यापासून उंदरांना काही आरामशीर फिरता येईना. मांजर आपली रोज उंदीर दिसला की त्यांना पकडून खायची. त्यामुळे उंदरांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली. उंदीर आता फार काळजीत पडले. त्यांनी मांजरीचा कायमचा बंदोबस्त करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी एक सभा बोलवली.
सभेत याच्यावर वरीच चर्चा झाली. पण मांजराचा बंदोबस्त करायचा कसा हे कुणालाच समजेना. थोड्या वेळात एक हुशार उंदीर म्हणाला, मांजर अगदी हलक्या पायाने व अत्यंत चपळपणे फिरते. त्यामुळे आपल्यापैकी कुणालाच ती आल्याचे कळत नाही व त्यामुळे सतत आपण तिच्या तावडीत सापडले जाण्याची भीती लागलेली असते. तेव्हा एक तरूण उंदीर म्हणाला की काही करून आपण मांजराच्या गळ्यात घंटा बांधली पाहिजे.
सगळ्या उंदरांना हा उपाय अगदी पटला. एक उंदीर म्हणाला की छान हं मांजर चालायला लागली की घंटा वाजेल आणि आपण सावध होऊन तिच्यापासून दूर पळून जाऊ. सगळे फार खुश झाले आणि उपाय सांगितलेल्या उंदरांला स्वतःच्या हुषारीचा फार अभिमान वाटला. तेवढ्यात एक म्हातारा उंदीर बोलला, थांबा हा वेडेपणा आहे. मला एवढेच सांगा मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? तेव्हा सर्वजण एकमेकांकडे बघू लागले. तितक्यात मांजर तेथे आली व तिने एका उंदरावर झडप घातली.
उपदेश : अमलात न येणारा उपाय कुचकामी ठरतो
माहिती संकलन:प्राची तुंगार