दुःख ओळखता यायला हवं……
एक वाट होती छोटीशी
लगेच संपणारी,
दुरून साजरी दिसायची,
पण जवळ गेल्यावर हताश भासायची.
(भासायची नव्हे; हताशच असायची)
तुरळक रहदारी असायची तिच्या वाटेवर,
तेच तेच नेहमीचे वाटसरू दिसायचे तिला रोज,
त्यांची त्यांची दुःख घेऊन ते चालायचे रोज तिच्या वाटेने,
त्यातही ठेच लागली की तेही तिलाच दोष द्यायचे.
पण तिच्या दुःखाचं काय?
साधा विचार देखील कुणी करत नसायचं तिचा,
तिच्या दुःखी असण्याचं कारण काय;
तर तिच्या वाटेवर एक साधं झाडही नव्हतं,
खाच खळग्यांनी पूर्णपणे विद्रूप झाली होती ती,
मला जाणवलं तिचं दुःखी असणं;
मग मी दोन-चार रोपं लावली तिथे,
ग्रामपंचायती सोबत पत्र व्यवहार करून तिची डागडुजी केली.
आता वाटसरूंचा राबता वाढलाय त्या वाटेवर; येता जाता क्षणभर विसावतात तिथल्या झाडाखाली, तेही आता त्या वाटेने जाताना आनंदी असतात. मागे एकदा गेलो तिथून मी; तर मला थँक्यू म्हणाली. आनंद वाटला मला. त्या वाटे इतकं कृतज्ञ दुसरं कुणी नसेल असं वाटलं मला तेव्हा.
सांगायचा मुद्दा असा की, समोरच्याचं दुःख ओळखता यायला हवं. समोरच्याला आनंद दिला की आपल्यालाही आनंदच मिळतो.
किशोर देशमुख…….
२१.१२.२०२३
असा मुसळधार पाऊस..पडला की आठवते ही ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांची कविता…
पावसाच्या धारा येती झरझरा
झाकळले नभ, वाहे सोसाट्याचा वारा
रस्त्याने ओहोळ जाती खळखळ
जागोजागीं खाचांमध्ये तुडुंबले जळ
झळके सतेज, ढगांवर वीज
नर्तकीच आली गमे लेवुनिया साज
झोंबे अंगा वारे, काया थरथरे
घरट्यांत घुसूनिया बसली पाखरें
हर्षलासे फार, नाचे वनीं मोर
पानांतून हळूं पाहे डोकावून खार
झाडांचिया तळी, डोईवरी मारा
रानातील गुरे शोधिती निवारा
नदीलाही पूर, लोटला अपार
फोफावत धावे जणू नागीणच थोर
झाडांची पालवी, चित्ताला मोहवी
पानोपानी खुलतसें रंगदार छबी
थांबला ओझर, उजळे आकाश
सूर्य येई ढगांतून, उधळी प्रकाश
किरण कोंवळे भूमीवरी आले
सोनेरी त्या तेजामध्यें पक्षीजात खुले
धरणी हासली, सुस्नात जाहली
वरुणाच्या वर्षावाने मनी संतोषली
कवयित्री – शांता शेळके.