गुरुपौर्णिमा (आषाढ शुध्द पौर्णिमा)


gurpaurnima
भारतातील शिक्षण पध्दतीत ‘गुरू-शिष्य’ प्रथेला फार महत्त्व आहे.
वयाची आठ वर्षे पूर्ण झाल्यावर मौंजीबंधन विधी करून ब्राह्मण मुले विद्यार्जनासाठी गुरूगृही जात असत. एक तप (१२ वर्षे) विद्यार्जन करून ते गृहस्थाश्रमात प्रवेश करीत असत.
गुरूला वंदनीय मानून आदर व्यक्त करण्याच्या हेतूने हा सण निर्माण केलेला आहे. महर्षी व्यास जगाचे आद्यगुरु होते असे हिंदू मानतात. त्यामुळे या दिवशी महर्षी व्यासांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे.
या दिवशी महर्षी व्यासांची पूजा करतात व खालीलप्रमाणे श्लोक म्हणून त्यांना वंदन करतात.

ॐ नमोस्तुते व्यास विशाल बुध्दे फुल्लारविंदाय तपत्रनेत्रयेन व्रया भारत तैल पूर्णः प्रज्वलितो ज्ञानमयः प्रदीपः॥

याशिवाय कोणत्याही विषयातील आपापल्या गुरुजनांना आदराने वंदन करतात.
गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करतात. गुरु आपणांस नवी दृष्टी देतात. योग्य पध्दतीने जाणतेपणाने कष्ट करण्यास शिकवतात. एकाग्रता, सहनशीलता, त्याग, आज्ञाधारकता वगैरे सदगुण गुरुमुळेच आपणांस प्राप्त होतात.
अशा गुरुंविषयी निष्ठा ठेवून आदर व्यक्त करण्याचा गुरुपौर्णिमा हा विशेष दिन आहे म्हणूनच व्यास पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून मानतात.
आपल्या गुरुबद्दलची निष्ठा सतत जागरुक ठेवण्याचा, गुरुचे स्मरण करण्याचा हा मंगल दिन आहे. या दिवशी रुद्राभिषेक करून गुरूंना वस्त्र-दक्षिणा किंवा तत्सम काहीतरी देऊन आपली कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रथा आहे.

गायन-नृत्य किंवा चित्रकला वगैरे कलाक्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा फार महत्त्वाचा दिवस आहे. गुरूंच्या आशिर्वादाने हे विद्यार्थी आपापली कला लोकांसमोर सादर करतात.


Leave a Comment

error: Content is protected !!