गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे. महाराष्ट्राच्या नववर्षाची सुरूवात गुढीपाडव्यापासून होते. हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. या वर्षी 9 एप्रिल 2024 ला महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. पारंपरिक वेषभूषा करून, घरोघरी गुढी उभारून, गोडाधोडाचा स्वयंपाक करून, सार्वजनिक ठिकाणी गुढीपाडवा निमित्त रांगोळ्या, देखावे, शोभायात्रा काढून, एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतात आणि मराठी नववर्षाचं स्वागत केलं जातं.
गुढीपाडव्याचे महत्त्व
असे मानले जाते की रामायण काळात गुढीपाडव्याच्या दिवशी श्री रामजींनी वानरराज बळीच्या अत्याचारातून लोकांना मुक्त केले तेव्हा तिथल्या लोकांनी आपला आनंद व्यक्त करण्यासाठी घराघरात विजयाचा झेंडा फडकावला होता.
हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. हे साडेतीन मुहूर्त म्हणजे गुढी पाडवा, अक्षय्य तृतीया आणि दिवाळी पाडवा आणि दसरा हा अर्धा मुहूर्त मानला जातो.
चैत्र महिन्यातील या तिथीनुसार सर्व युगांतील सतयुगाची सुरुवातही याच तिथीपासून झाली असे मानले जाते. असे म्हटले जाते की गुढीपाडव्याचा दिवस निश्चित करण्यापूर्वी, प्राचीन भारतीय गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ भास्कराचार्य यांनी त्यांच्या संशोधनानुसार, भारतीय पंचाग रचले. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचे दिवस, महिने आणि वर्षांची गणना केली आणि त्यानुसार चैत्र महिना प्रतिपदेचा गुढी पाडवा आहे.
शालिवाहन शकाची सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवशी झाली असे मानले जाते.
असे मानले जाते की गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माजींनी विश्वाची निर्मिती केली.
या प्रकारे गुढी उभारली जाते
गुढी ही उंच बांबूपासून तयार केली जाते. बांबूच्या एका टोकाला रेशमी कापड, कडुलिंब, फुलांचा हार आणि साखरेची माळ बांधून त्यावर तांबा किंवा चांदीचं भांडं बसविला जातं. गुढी नंतर पाटावर तांदूळ ठेवून उभी केली जाते. पाटाभोवती रांगोळी काढली जाते. या दिवशी हिंदू नववर्ष सुरू होते.
गुढी म्हणजे विजय चिन्ह. हा सण कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात उगाडी आणि महाराष्ट्रात गुढी पाडवा म्हणून ओळखला जातो.
मिरवणूक
गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदू संस्कृृतीची झलक दाखविणाऱ्या मिरवणुका काढल्या जातात. महिला, पुरुष, लहान मुले पारंपरिक पोशाखांत या मिरवणुकीत सहभागी होतात.
गुढीपाडवा का साजरा केला जातो ?
कडुलिंबाचे महत्त्व
या दिवशी कडुलिंबाचे खास महत्त्व असल्याचे सांगितलं जातं. या दिवशी गुढीला कडुनिंबांच्या कोवळ्या पानांची डहाळी बांधली जाते. या दिवशी गोड पक्वान्नांसोबत कडुलिंबाची पाने खाण्याचीही परंपरा आहे.
कडू गोड आठवण म्हणजे, पाढव्याच्या महुर्थावर सगळ्यांना लिंब दिला जातो, हा लिंब म्हणजे काय तर, लिंबाचा पाला, चिंच गूळ, खोबरे, हरबऱ्याची डाळ घालून चटणी बनवली जाते आणि ती घरातील सगळ्यांना वाटली जाते.आणि ती खायचीच असते.जी लहान पनी मला खायला सांगितली तर” मला माझ्यावर अन्याय होतोय असे वाटायचं”.पण यातील खासियत ही होती त्यातील प्रत्येक घटक हा आयुर्वेदाच गुणांनी बनलेला असतो.
कृषी विषयक महत्त्व
डॉ. सरोजिनी बाबर यांच्या मतानुसार गुढीपाडव्यास लोक-संस्कृतीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. भूमी हा जगाचा गर्भाशय, तिच्यात सूर्य बीज पेरतो, वर्षनाच्यामुळे भूमी सुफलित होते. सर्जनाला मिळणाऱ्या ऊर्जेशी जोडलेला हा एक सण आहे असे लोकसंस्कृतीचे अभ्यासक आवर्जून सांगतात.
आरोग्यदृष्ट्या महत्त्व
चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रातःकाळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. पचनक्रिया सुधारणे, पित्तनाश करणे, त्वचा रोग बरे करणे,धान्यातील कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधी गुण ह्या कडुनिंबाच्या अंगी आहेत असे आयुर्वेदात मानले जाते.) शरीराला थंडावा देणाऱ्या कडूनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात घालणे, ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते.