बलसागर भारत होवो

बलसागर भारत होवो
विश्वात शोभुनी राहो॥

हे कंकण करि बांधियले जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिध्द मरायाला हो॥१॥

वैभवी देश चढवीन सर्वस्व त्यास अर्पीन
हा तिमिर घोर संहारीन या बंधु सहाय्याला हो॥२॥

हातात हात घालून ह्रदयास ह्रदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून या कार्य करायाला हो॥३॥

करि दिव्य पताका घेऊ प्रियभारतगीते गाऊं
विश्वास पराक्रम दावू ही माय निजपदा लाहो॥४॥

या उठा करु हो शर्थ संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ भाग्यसुर्य तळपत राहो॥५॥

ही माय थोर होईल वैभव दिव्य शोभेल
जगतास शांति देईल तो सोन्याचा दिन येवो॥६॥

मंगल देशा पवित्र देशा
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा

अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा

भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा
शाहीरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा

ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी;
जोडी इह पर लोकांसी, व्यवहारा परमार्थासी,

वैभवासि, वैराग्यासी
जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ॥१॥

अपार सिंधुच्या भव्य बांधवा, महाराष्ट्र देशा
सह्याद्रीच्या सख्या, जिवलगा, महाराष्ट्र देशा

पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषा
गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटिंच्या रेषा

तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची
मंगल वसती जनस्थानिंची श्रीरघुनाथांची
ध्येय जे तुझ्या अंतरी….. ॥२॥

– गोविंदाग्रज

Leave a Comment

error: Content is protected !!