What is juvenile delinquencyकिशोरवयीन मुला-मुलींमध्ये आढळून येणारी प्रमुख समस्या म्हणजे बालगुन्हेगारी होय . एखाद्या इंग्रजी चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे 13 ते 19 वयोगटातील किशोरवयीन मुले चोरी , दरोडा , मारामारी यासारखे गुन्हेगारीचे वर्तन करताना आढळतात. वाढते शहरीकरण व औद्योगिकीकरण यामुळे संपूर्ण समाजव्यवस्था झपाट्याने बदलत चालली आहे . कुटुंबाचे विघटन व नियंत्रणाचा अभाव यामुळे लहान मुलांमध्ये एक प्रकारची अस्वस्थता येऊ लागली आहे . “सामाजिक नियंत्रणासाठी व समाजिकीकरणासाठी जे नियम कायदे किंवा आदर्श मूल्ये समाजाने स्वीकारलेली असतात त्यांचे उल्लंघन करणे म्हणजे गैरवर्तन होय . ” बालकांकडून घडणारे असे गैरवर्तन म्हणजे बालगुन्हेगारी होय .भारतीय दंडविधान संविधानामध्ये बालन्याय कायदा – 1986 नुसार 7 वर्षे वयावरील पण 18 वर्षाखालील मुले मुली जेव्हा कायद्याच्या चौकटीत न बसणारे वर्तन करतात तेव्हा ती बालगुन्हेगार ठरतात . गुन्ह्यांचे एकंदर स्वरूप आणि परिणाम सारखेच असले तरी गुन्हा आणि बालगुन्हा यामागील हेतु किंवा प्रेरणा विविध स्वरूपाच्या असतात . गुन्हेगार जन्माला येत नसतात तर गुन्हेगार घडविले जातात . कौटुंबिक व सामाजिक परिस्थितीतून गुन्हेगार निर्माण होतात .
बालवयात जर गुन्हेगारी प्रवृत्तीला उत्तेजन मिळाले तर प्रौढवस्थेत गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडतात . मुलांच्या शारीरिक व मानसिक गरजा पूर्ण करण्यात कुटुंबाला व समाजाला अपयश आले तर बालगुन्हेगारी निर्माण होते .बालगुन्हेगारीची कारणे ( juvenile delinquency causes)कनिष्ठ सामाजिक-आर्थिक दर्जा असणाऱ्या कुटुंबांमधील मुले – मुली चटकन बालगुन्हेगारीच्या वर्तनाकडे वळतात
.कनिष्ठ सामाजिक – आर्थिक स्तरांमधून येणाऱ्या समवयस्कांपुढे जे नकरात्मक व समाजविरोधी सामाजिक मानदंड असतात त्यामुळे काही जण बालगुन्हेगारीकडे वळतात .कनिष्ठ आर्थिक स्तर किंवा दारिद्र्य यातून मुक्त होण्याचा मार्ग म्हणून बालगुन्हेगारीकडे पाहिले जाते .बऱ्याच वेळा कुटुंबातून किंवा किंवा शेजाऱ्याकडून अशा प्रकारची चुकीची शिकवण मिळते की सामाजिक वर्चस्व प्रस्थ[पित करण्यासाठी गुन्हेगारी वृत्तीची आवश्यकता असते . तसेच जेवढी समाजविरोधी , विघातक कृत्य अधिक तेवढी सामाजिक प्रतिष्ठा अधिक अशी धारणा बनलेली असते
. त्यासाठी गुन्हेगारीचे वर्तन केले जाते .समाजातील विशिष्ट जाती , धर्म किंवा पंथातील लोक गुन्हेगार असतात . अशा वातावरणात किंवा त्यांच्या सानिध्यात राहिल्याने लहान मुलांपुढे तोच आदर्श असतो . शिवाय संगतीच्या प्रभावामुळे मुले बालगुन्हेगार बनतात .गरिबी , शिक्षणाचा अभाव , मुख्य प्रवाहापासून दूर फेकलेली कुटुंबे यामुळे बालगुन्हेगारीस खतपाणी घातले जाते .कौटुंबिक विघटन , कौटुंबिक वातावरण , आई-वडील यांच्यातील भांडणे , पालकांकडून होणारी हेळसांड यामुळे मुले बालगुन्हेगारीकडे वळतात .बालगुन्हेगारांचे पालकच मुळात अडाणी , अशिक्षित , व्यसनाधीन , गुन्हेगार व समाजविरोधी कृत्यात गुंतलेले असतात . त्यांच्या अनुकरणामुळेच मुलांमध्ये गुन्हेगारीची प्रवृत्ती वाढीस लागते व ती बालगुन्हेगार बनतात .
गुन्हेगारीची पार्श्वभूमी असणाऱ्या पालकांची मुले आपोआपच गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता असते .आई-वाडिलांमधील बेबनाव , कलह , शिस्तीतील विसंगती किंवा कडक शिस्त यांचा मुलांच्या सामाजिक विकासावर विपरीत परिणाम होतो . यामुळे बालगुन्हेगारी वाढते .एकतर्फी प्रेम , लैंगिक वर्तनाबाबत असणारे जबरदस्त आकर्षण , भावनिक नियंत्रणाचा अभाव , कायद्याबाबत अजिबात भीती नसणे यांसारख्या कारणांमुळे ही मुले बालगुन्हेगारीकडे वळतात .