असाही एक पावसावरचा निबंध


बाहेर पाऊस पडतोय. मस्त गरम चहा घेतला आहे. कांदाभजीचा बेत झाला आहे. मग पुन्हा चहा होणार आहे. अहाहा. केवळ मजा आहे.

पावसाचा असा आनंद घेतो आहे.

2 बीएचकेच्या घरात पावसाचा असा आनंद घेताना भूतकाळ मात्र पाठ सोडत नाही. तो पार शरीराच्या हाडांमध्ये खोल रुतलेला आहे.

आर्थिक परिस्थिती बदलली की आपण उभे आयुष्य ज्याच्या नावाने बोटे मोडत असतो तेच आनंद द्यायला लागते.

आम्ही पावसाच्या नावाने कायम बोटे मोडत असू.

माझे वडील बांधकाम मजूर. पावसाळा आला की टेन्शन असायचे. पावसाळा आला की काम बंद होते. चार महिने अधूनमधून पंधरा एक दिवसातून दोनेक दिवस काम मिळाले तर मिळाले. नाहीतर निव्वळ अंधार.

जेवणाला बेसन भाकरी, खिचडी, गावावरून आलेले हुलगे, बाजरीचा खळगुट, खर्डा असा स्वस्तातला कार्यक्रम असायचा. पावसाळा असा घालवावा लागायचा.

कौलाचे बारकेसे घर. जमिनीवर, कोब्यावर पाणी पडू नये म्हणून चार ठिकाणी चार टोपं पाणी झेलायला ठेवलेले असत. आणि वडिलांना ते रिकामे करण्यासाठी रात्री झोपमोड करावी लागे.

कौलावर किती ताडपत्री घाला, तरट पांघरा, पाणी घरात सांडणारच. उंब्र्याला तीन फूट उंच आकाराची, खालून आर्धी चौकट कव्हर करेल इतकी गोणी लावायची. गोणी अडकवायला दोन बाजूला दोन खिळे ठोकायचे. त्यामुळे पाण्याचे शिंतोडे घरात येत नसत.

कौलाखाली, दाराबाहेर पाण्याच्या बादल्या भरायला ठेवायच्या. तेच पाणी भांड्याला कपड्याला वापरायचे. पावसाच्या पाण्याने त्या बादल्या भरताना पाहणे हाच विरंगुळा असे.

मी अकरावीनंतर कल्याण स्टेशनला पेपर स्टॉल चालवू लागलो. पावसाळा आला की अंगावर काटा उभा राही. एक तर धंदा कमी होत असे, शिवाय पेपर पावसाच्या पाण्यापासून सांभाळावे लागत. डेपोतून भर पावसात वितरकाकडून सारे पेपर विकत घ्यायचे, अन् मग सात वाजता स्टॉल लावायचा.

कधी कधी पहाटे पेपर घेताना बिलकुल पाऊस नसे, त्यामुळे सारेच जण कच्चून माल घेत असत, पण स्टॉल लावला की पाऊस काशी करायचा. अन् साऱ्या मालाची ऐशीतैशी. त्या मालाला दुपारी बारापर्यंत पावसापासून व्यवस्थित प्रोटेक्ट करावे लागे, दुसऱ्या दिवशी सकाळी माल कोरडा असला तर डेपोवर return घेतला जाई.

सर्वात आधी midday वाल्याने स्टॉलसाठी मोठ्या छत्र्या वाटल्या होत्या. पण ते आमच्यासारख्या स्टेशनवर स्टॉल असणाऱ्यांनाच छत्र्या देत, कारण आम्ही जास्त माल विकत असू. तसेही आम्हीं midday पेपर सर्वात पुढे, ग्राहकांना दिसेल असा ठेवत असू, कारण ते एखाद्या hot model चा बिकिनीमधील फोटो कव्हर पेजवर छापत असत, दिखता है वही बिकता है, हे मला तेव्हाच कळले होते.

नंतर टाइम्स-लोकमतवालेसुध्दा छत्र्या वाटायला लागले.

पहाटेपासून दुपारी एकपर्यंत काम चालत असे, स्टॉल बंद करेपर्यंत दुपारचे एक वाजे.

मला तिथेच थेटरला जाऊन पीच्चर बघायचा नाद लागला. एखाद्या हॉटेलमध्ये दुपारी वडापाव, इडलिबिडली काहीबाही खाऊन, तोंडावर पाणी मारून, कंगव्याने केस विंचरत हाफ पँट, टी-शर्टवर ‘सागर टॉकीज’ला तीस रुपयाचे तिकीट काढत पिक्चर पाहत असे.

मी आयुष्यात पहिल्यांदा स्टॉलवरचे काम संपवून असेच जाऊन रणदीप हुडाचा ‘D’ नावाचा सिनेमा थेटरला पाहिला होता. मला तो सिनेमा खूप आवडला होता. माझ्या माहितीप्रमाणे, हुडाचा हा पहिला सिनेमा. त्यानंतर तिथे अनेक सिनेमे पाहिले.

मी स्टॉलवर पेपर विकत असे अन् माझ्या शाळेतल्या पोरी सकाळी सकाळी लगबगीने नटून थटून मुंबईच्या कॉलेजला जाण्यासाठी माझ्या समोरून रेल्वे स्टेशनात जात असत. त्या माझ्याकडे पाहत, पण माझी त्यांच्या सोबत नजर भिडवण्याची हिंमत होत नसे. त्या दिसल्या की मी मान खाली घालत असे.

आम्ही फॅन्ड्रीतला जब्या तंतोतंत जगलेली मुलं आहोत.

तरी तेव्हाच्या गरिबीच्या मानाने पेपर विकून पैसा ‘बरा’ येत असे.

पावसात नोटा ओल्या होई. उरलेल्या मालाचा बंडल, त्याला पुर्ण प्लॅस्टिकने कव्हर केलेले असे. तो बंडल हातात घेत, बाजूच्या पानटपरीवाल्याकडून, तेव्हा ओमपुडीचे प्लॅस्टिकचे पाकीट येत असे, ज्यात अनेक ओम पुड्या असायच्या. ते रिकामे झालेले पाकिट पैशे ठेवायला घ्यायचे. त्यात नोटा ठेवायच्या. घरी पोहोचल्या पोहोचल्या, आईकडे त्या देत, ती घासलेटच्या स्टोव्हवर भाकरी कालवण वगैरे करतच असायची. ते करता करता ती त्या नोटा स्टोव्हखाली ठेवत असे. तासाभरात नोटा वाळल्याखडंग व्हायच्या.

पेपर विकताना स्टेशनवरचे भिकारी, धुपवाले, झोळीत लेकरं बांधून भिका मागणाऱ्या आंध्रच्या बाया, हिजडे, लॉटरीवाले साऱ्यांचा परिचय झाला होता. त्यांच्यातले कोणी सकाळपासून जमा केलेली चिल्लर जमा करत माझ्याकडून नोटा घेऊन जाई.

लघवीला जायचे असल्यास मी कोणत्याही तृतीयपंथी व्यक्तीला सांगे, ये, स्टॉलपे पाच मिनिट ध्यान रख, मै पिशाब करके आता हु. आणि ती पाच काय, कितीही मिनिटे स्टॉलवर बसत असे.

मराठी लेखन – Marathi Lekhan✍️, [17-06-2024 21:09]
शरीरविक्रय करणाऱ्या भडक लाली लावलेल्या, तोंडावर पावडर थापलेल्या पाच-सहा बायका स्टॉलपासून आठ-दहा फुटांवरच उभ्या राहायच्या. सकाळी दहा-अकरा वाजले की त्या तिथे हजर होत. एखादा भय्या तिच्यातल्या एकीच्या जवळ जाई आणि कामाचं बोलत असे. बोलणे पार पडले, डील झाली की एका रिक्षात बसून ते दोघे पुढच्या कार्यक्रमासाठी पसार होत. तासाभरात साऱ्या निघून जात, उरलेली एखादी वयाची पंचेचाळीशी सरलेली तिथे गुटखा चघळत उभी राहायची. दुपारचे बारा वाजेपर्यंत तिलाही गिऱ्हाईक मिळतच असे.

खूप साऱ्या आठवणी आहेत. पावसाळा आला की दरवर्षी ह्या साऱ्या आठवणी दाटून येतात. अशा हजारो आठवणी आहेत. अनेक जण म्हणतात, तुझी शहाणीव तुझ्या वयाला सुट होत नाही. मी एवढ्याशा वयात किती वेगवगळ्या पातळीवरचे अनुभव घेतले आहेत, याचा त्यांना अंदाज नसतो.

पण ह्या गरिबीने, ह्या पेपरच्या लाईनीने, ह्या पावसाने मला खूप खूप शिकवले.

भरपूर माल घ्यावा आणि पाउस यावा, अन् आपण हतबल व्हावे, असे प्रसंग आले, त्यामुळे मी पावसाचे, आपत्तीचे येणे स्वीकारू लागलो, मग त्यासाठी करण्याच्या झगड्याची पूर्वतयारी करू लागलो, संकटांना घाबरून उध्वस्त होण्यापेक्षा तोंड द्यायला शिकलो. पावसाने इतके फटके दिले आहेत की आता मला कळले आहे की त्याला कसे tackle करायचे ते. आणि याचाही मला अंदाज आहे की तो त्याच्या पोतडीतून असे काही बाहेर काढेल ज्याला तोंड देण्याचा माझा सराव नाही.

पावसाने मला पेशन्स शिकवले. सहन करायला शिकवले, त्यानेच मला शिकवले की मी तुझा बांधील नाही, मला तुझी दया येत नाही, तुझे वाटोळे जरी होत असले, तुझे नुकसान होत असले तरी मी पडणार आणि माझ्यावर तुझे कोणतेच नियंत्रण नाही, तू माझे काहीच वाकडे करू शकत नाहीस.

गुरबतमधून वर आलात की असे अनुभव लिहिता येतात, व्यक्त होता येते, ह्या देशात लाखो जीवांना ही संधीसुध्दा मिळत नाही.

– निलेश अभंग, कल्याण

पोस्टमध्ये दिलेला हा फोटो प्रातिनिधिक आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!