छोटया छोटयाशा क्षणांतील
मजा चाखत जगता यावे
पार नसलेल्या आनंदाला मग
इवल्याशा मुठीत मावता यावे
थकून सायंकाळी घरी आल्यावर
प्रसन्न वदनी दीप उजळावे
दाराआड लपलेल्या गंमतीने
चिमुकल्या पावलांचे रुप घ्यावे
हेतूक – अहेतूक नाजूक कटाक्षांनी
मोहरत्या कळयांचे गंध व्हावे
जीवन डवरणा-या क्षणांना
धडकत्या स्पंदनांनी साक्ष रहावे
दाटून येणा-या स्निग्धतेतून
पोक्तशा मायेचे स्पर्श जाणवावे
जीवनाशी राखून जाळ अबाधित
विश्वासाने या मला वात्सल्य ल्यावे
चिमखडया गोड गोड बोलांना
भाबडे बोबडे प्रश्न पडावे
निरर्थक अशा हावभावांनीही
हसून हसून बेजार व्हावे
पक्ष्यांचा ऐकत मंजूळ किलबिलाट
हिरव्याकंच साजाने नाचनाचावे
क्षितीजावर करुन सोनेरी उधळण
निसर्गाच्या कुंचल्याने परीस व्हावे
महाल गाडया नि शेतीवाडया
कशास यांचे अप्रूप वाटावे
फुलवाया मळे आनंद अंगणी
वणवण फिरण्या ते का लागावे
आनंदाचा असा पारिजातक
सदैव दरवळतो मनामनात
शोधावा तेव्हा तो सापडतो
आपला आपल्याच आंगणात
यतीन सामंत