अक्षय तृतीया हा सण वैशाख शुध्द तृतियेला साजरा केला जातो. या सणाला ‘अक्षय तृतीया’ नाव पडण्याचे कारण भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले आहे की ‘या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही’ म्हणून हिला मुनींनी अक्षय तृतीया असे म्हटले आहे.
देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (अविनाशी) होते. अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे.
या तिथीस महत्त्व येण्याचे कारण म्हणजे हा काहींच्या मते कृतयुगाचा किंवा त्रेतायुगाचा प्रारंभदिन आहे
. कालविभागाचा कोणताही प्रारंभदिन भारतीयांना नेहमीच पवित्र वाटतो म्हणून अशा तिथीस स्नान, दान इत्यादी धर्मकृत्ये सांगितली जातात. या दिवशी विष्णूची पूजा, होम, दान करावे असे शास्त्र सांगते. उन्हापासून संरक्षण करणा-या छत्री, वहाणा अशा वस्तू दान करण्याची पध्दत आहे.
जनमानसात मात्र हा सण जास्त करून चैत्रातील हळदीकुंकवासाठी माहीत आहे. स्त्रिया चैत्रात बसविलेल्या चैत्रगौरीचे या दिवशी विसर्जन करतात.
चैत्र महिन्यातल्या कोणत्याही दिवशी सोयीनुसार हळदीकुंकू केले जात असले तरी काही जण अक्षयतृतियेलाच हे हळदीकुंकू करून सुवासिनींना कैरीची डाळ, कैरीचे पन्हे, नारळीची करंजी असे खायला देतात.
याशिवाय बत्तासा, मोग-याची फुले किंवा गजरे देतात आणि भिजवलेल्या हरब-यांनी त्यांची ओटी भरतात. खस किंवा वाळयाचे अत्तर लावून गुलाबपाणी शिंपडतात.
हळदीकुंकवाला चैत्रगौर सजवितांना कलिंगड किंवा खरबूज कापून त्यात देवीची स्थापना करतात व फराळाचे पदार्थ करून व विविध खेळणी वगैरे मांडून ती जागा शोभिवंत करतात.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे इत्यादीही करतात.